मुख्य सामग्रीवर वगळा

करवंदाच्या जाळ्या.....!


करवंदाच्या जाळ्या.....!




वाटे कधी कधी , जावे भेटीस... या क्षणांनी भरलेल्या अभाळास.....!
                          जेमतेम चार साडे चार वर्षांची होते. काका Doctor होऊन त्यांची बदली नुकतीच दाभाड या गावात झाली होती. वर्षभरात त्याचं लग्न हि झाल, चार सहा महिन्यातून ते घरी नाशिकला येत असत. ह्या फेरीला त्यांनी काही दिवसांसाठी काकी सोबत मम्मीला आणि मला नेण्याच ठरवलं. मी भलतीच खुश झाले, अस ऐकल्याबरोबर आनंदाने नाचू लागले, घरात नुसता कल्लाह माजून ठेवला. घरातले सर्वच खुश झाले. मी घरात एकुलती-एक लाडाची “चिऊ” होते. त्यामुळे माझ्यासाठी कुणाचाही कोणत्याही गोष्टीसाठी नकार नसे. मम्मी सासुरवाशीण असल्यामुळे तिला कधीच कुठेच जाण्याची संधी मिळत नव्हती. तिलाही थोड बर वाटल. पप्पांचा स्पर्धा परीक्षांचा (MPSC) अभ्यास चालू असल्या कारणाने ते येऊ शकले नाही.
            दाभाड हे एक छोटस खेड गाव, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे. मजेत पोहचलो. नाशिक ला Cement-Concret च शहरी भागात घर असल्यामुळे तेव्हा खेडे गावातल्या घराचं Attraction भारीच होत. शेणा-मातीच, कौलांच, तसेच दारापुढे अंगण ओटा, अंगणात-तुळस, भल्यापहाटे पक्षांचा चिवचीवाट खूपच रम्य असा क्षण होता. दोन दिवस काकांनी संपूर्ण गाव फिरवल, “मस्त-मस्त मज्जा आली”. त्यात एक दिवस वज्रेश्वरी ह्या देवस्थानी फिरून आलो, दाभाड पासून १५-१६ किलोमीटर दूर असाव.
            दोन तीन दिवसांतच माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी झाल्या. गावात डॉक्टरांचं घर हे थोड प्रशस्थच असत, मग त्यांच्या कडे आलेल्या पाहुण्यांचं कौतुकही तेवढच. मम्मी लाही चहा-पाण्याला आजूबाजूच्या बायका बोलाऊ लागल्या. माझ्या तर एवढ्या जिवलग मैत्रिणी झाल्या कि दिवसभर त्यांच्यात खेळत असे. तेथील लोक हे कोकणी असल्यामुळे त्यांची भाषाही मी बोलायचा प्रयत्न करत, त्या सर्वाना माझ्या बोलण्याच फार कौतुक वाटून हसू येत असे. त्यांच्या सोबत विहिरीवर पाणी भरायला आम्ही तिघी जात, माझ्याकडेही छोटीशी कळशी असे. मी सगळ्याच बाबतीत लुटपुट करणारी, त्यामुळे सर्वच बायका माझी टींगलटवाळी करत हसत असे. मीही बोलायला फार चतुर त्यांच्यासोबत मोठ्या-मोठ्या गप्पा मारत असे. “मी कुठून आले, आमच्या घरी कोणकोण असत, आमचे पप्पा खूप-खूप अभ्यास करतात. आमच नाशिकला मोठ्ठ घर आहे आणि मी सगळ्यांची फार लाडाची आहे”. हे आवर्जून आणि न विसरता येताजाता सर्वाना सांगायचं बरं....
           एक दिवस आल्या सगळ्या मैत्रिणी घरात “आगे चिऊ, चल ना गे खेलायला” चल की गं..! मीही लगबगीन घरातल्या खेळण्या सगळ्या सोडून उठले आणि निघाले त्यांच्या पाठोपाठ. खेळता खेळता सर्व जमल्या काही वेळानंतर त्या अचानकच म्हणल्या “अगो.., चला आज पाड्यावर करवंदाच्या जाल्या तोडायला जाऊयात”. मीही मान डोलवत म्हंटल “चला”, काही अता नाही-कि पता नाही, बस... बाई निघाल्या की, आता हा पाडा गावापासून बराच दूर होता, पण त्या माझ्या मैत्रिणींच येण-जाण नेहमीचच असाव, त्यामुळे त्या लगेचच उठल्या आणि निघाल्या होत्या. तिथ पोहचायलाच अर्ध्या तासाच्या वर वेळ लागला. चांगलीच मज्जा करत, रमत-गमत सगळ काही चालल होत, मग कशाला येते घरातल्यांची आठवण.
          वाह:! पहिल्यांदाच करवंदांच्या जाळ्या पहिल्या, सगळ्या काट्या-कुपाट्यांमध्ये घुसून हवे तेव्हडे करवंद तोडले. तिथच पोटभर मनसोक्त खाल्ले. घरी नेण्यासाठी टोपलीभर काढून घेतले.
          घरी काय परिस्थिती चालू आहे याचा तीळभरही अंदाज नव्हता. तीन तासाला जास्त वेळ उलटून गेली होती. अख्या गावभर मम्मी, काका-काकी धुंडाळत फिरू लागले. घर असच वार्यावर सोडून कुठ-कुठ शोधू लागले. काकी घरी परतली तेवढ्यात मी आले. तिने लगेच मला सांगितलं “आग चिऊ कुठ होतीस..?, आम्ही खूप शोधत होतो तुला”! आता तू एक काम कर, पलंगा खाली जाऊन लप नाहीतर मम्मी खूप मारेल तुला, खूप चीडलीय ती, रडतही होती.
       दहा एक मिनिटांतच मम्मी, काका मागेपुढे आले. काकीन सांगता-सांगताच मम्मीनं धरली तशी ओढली पलंगा खालून, जे बेदम मारलं काही विचारता सोय नाही. तिच्या हातातल्या बांगड्या फुटेपर्यंत मारलं...! जाशील परत इतक्या लांब कुठ? बोल...! जाशील? काका-काकीलाही कसली आवरते माझी हि आई. नाही न मम्मी..., नको न मारू, नही जाणार कुट्च... कुट्च नही जाणार.....
       शेवटी काही वेळानंतर लगेचःच तिने स्वतःहाच जवळ घेतलं आणि समजवलं कारण ती त्यावेळेस एक आईच नव्हे तर, एक सासुरवाशीणहि होती. त्याचप्रमाणे पप्पांचाही माझ्यावर खूप जीव होता. ह्यासगळ्या विचाराने तिच्या डोक्यात थैमान घातलं असाव. इथून पुढे कुठेही जाताना घरातल्या माणसांणा सांगून जायचं बरं...! हो आणि तू पण इतक मारायचं नाही बरं...! नाहीतर, अजून लांब-लांब जात जाईल तेही न सांगता. (आघाऊपणाचा कळसच होता म्हणा)....
परत सार काही काय-पालट झालं, आणखी दोन झणझणीत बसल्या.....!
अशा ह्या करवंदाच्या जाळ्या कायमस्वरूपी अशा लक्षात राहिल्या..., कि जेव्हाही करवंद बगते तेव्हा पडलेला तो मार नक्कीच आठवतो.....




 राजश्री जगताप

टिप्पण्या